– —–गोंडपिपरी (सुनील डी डोंगरे )15 ऑक्टोबर – -डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायासह नागपूर येथे 14 ऑक्टोबर 1956 रोजी बौध्द धम्माची दिक्षा घेतली आणि नंतर 15ऑक्टोबर रोजी चंद्रपूर येथे धम्म दिक्षा सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे जिवंत साक्षीदार बोरगाव येथील 96 वर्षीय जनार्धनजी उराडे आहेत..
‘अस्पृश्य समाजाला पशुपेक्षाही नीच वागणूक देणाऱ्या हिंदूधर्मात जन्माला आलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही’ अशी घोषणा बाबासाहेबांनी 1935साली येवला मुक्कामी केली होती.. ती घोषणा 21 वर्षानंतर नागपूर येथे धर्मांतर करून त्यांनी पूर्ण केली. स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय आणि नीती या मानवी मुल्यावर आधारित बौध्द धम्म बाबासाहेबांनी स्वीकारला आणि स्वतः 5 लाख अनुयायांना धम्म्म दिक्षा दिली..
नंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे 15 ऑक्टोबर ला चंद्रपूर येथे धम्मदिक्षा सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.. या सोहळ्यातही लाखो लोकांनी बौद्ध धम्माची दिक्षा घेतली.. या ऐतिहासिक घटनेला आज बरोबर 70वर्षे झाली.. आपल्या डोळ्यांनी ही ऐतिहासिक घटना अनुभवलेले जिवंत साक्षीदार 96वर्षीय जनार्धनजी उराडे (बोरगाव )हयातीत आहेत..त्यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी 70 वर्षांपूर्वीच्या या ऐतिहासिक घटनेला उजाळा दिला..त्यांनी मुलाखतीत सांगितले,
-1956साली मी 26,27वर्षाचा असेन..!बाबासाहेबांच्या आदेशानुसार आम्ही समता सैनिक दलात कार्य करीत होतो.. त्यावेळी लाल रंगाचा शर्ट आणि खाकी पॅन्ट हा दलाचा ड्रेस होता..चंद्रपूरात बाबासाहेबांच्या उपस्थितीत आयोजित धम्मदिक्षा सोहळ्याबाबत आम्हास प्रचंड उत्सुकता होती.. खुद्द बाबासाहेबांचे प्रत्यक्ष दर्शन घेण्याची सुवर्ण संधी मिळाली होती.. -1956 साली वाहतुकीची साधने अत्यल्प होती.. आर्थिक स्थिती ही बेताचीच होती.. त्यामुळे बोरगाव ते चंद्रपूर हा 60 किमी चा प्रवास आम्ही पायी केला.. बऱ्याच गावचे अनेक जण पैदल आले.. थकल्यावर कुणी कोठारी, कुणी बल्लारशा येथे नातेवाईकांकडे विश्रांती घेत आणि पुढे निघत…
-बाबासाहेबांना किती अंतरावरून बघितले असे विचारता ते म्हणाले, आम्ही समता सैनिक दलात असल्याने बंदोबस्त ठेवण्यासाठी आम्ही स्टेज जवळ तैनात होतो.. अगदी 5फूट अंतरावरून आम्ही त्या युगपुरुषाचे दर्शन घेतले.. बाबासाहेब भाषणात काय म्हणाले असे विचारता त्यांनी सांगितले, ‘शिका संघटित व्हा आणि संघटित व्हा.. जुन्या रूढी सोडा आणि धम्म नियमाप्रमाणे जीवनाची वाटचाल करा..’! असा त्यांचा संदेश होता.
— बाबासाहेबांचा संदेश आज पाळला जातोय का असे विचारता ते म्हणाले, बाबासाहेबांनी सांगितल्यानुसार, आपण शिक्षण घेत आहोत.. नोकऱ्या मिळवत आहोत पण संघटित होत नाहीत.. समाजातील गटबाजी बाबत त्यांनी खंत व्यक्त केली.
–70वर्षांपूर्वीचा इतिहास सांगताना 96 वर्षीय जनार्धनजी उराडे यांचा हात थरथरत होता पण डोळ्यात तेज होते, आवाजात जोश होता.. या वयातही ते ठणठणीत आहेत, बाणेदार आहेत, स्वाभिमानी आहेत.. -गोंडपिपरी येथील निवृत्त शिक्षण विस्तार अधिकारी झेड जे उराडे यांचे ते पिताश्री आहेत आणि सध्या त्यांच्याकडे वास्तव्यास आहेत.









